नारळ क्षेत्रातील मूल्यवर्धन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी केरळमध्ये 'कोकोनट पार्क'ची उभारणी करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे:
- केरळ सरकार नारळ विकास मंडळाच्या (Coconut Development Board) सहकार्याने 'कोकोनट पार्क'ची (नारळ प्रक्रिया उद्यान) स्थापना करणार आहे.
- नारळ क्षेत्रातील प्रक्रिया, मूल्यवर्धन, उद्योजकता तसेच निर्यात-केंद्रित विकासाला चालना देण्यासाठी याची उभारणी महत्वपूर्ण ठरणार आहे.
- २ सप्टेंबर रोजी 'जागतिक नारळ दिन २०२६'च्या देशव्यापी उत्सवाचे उद्घाटन करताना केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीसन यांनी ही घोषणा केली.
'कोकोनट पार्क'बाबत विशेष बाबी:
- सदर 'कोकोनट पार्क' प्रकल्प नारळावर आधुनिक प्रक्रिया तसेच मूल्यवर्धन करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार या पार्कमध्ये निर्यातीच्या गरजा पूर्ण करणारी दर्जेदार उत्पादने तयार केली जातील याची खात्री केली जाईल.
- केवळ लागवडीच्या प्रक्रियेपलीकडे जाऊन या उपक्रमात प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विपणन (मार्केटिंग) या बाबींवरही भर दिला जाईल.
- नारळ उत्पादन आणि उत्पादकतेच्या बाबतीत केरळ मागे पडल्याचे मुख्यमंत्री सतीसन यांनी अधोरेखित केले आहे.