• 'रेमन मॅगसेसे पुरस्कार (Ramon Magsaysay Award)' २०२१ च्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • घोषणा करण्यात आलेल्या विजेत्यांना मनिला येथील रेमन मॅगसेसे केंद्रात २८ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात औपचारिकरित्या पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

विजेत्यांची यादी

  • डॉ. फिरदौसी कादरी (बांगलादेश): शास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या लसींचा शोध लावण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या या कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

  • मुहम्मद अमजद साकीब (पाकिस्तान): पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या सूक्ष्म वित्त संस्थांची स्थापना करून त्यांनी लाखो कुटुंबांची सेवा केली आहे. सदर कामाची दखल घेताना त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • रॉबर्टो बालोन (फिलीपाईन्स): मत्स्यपालन आणि समुदाय पर्यावरणवादी म्हणून प्रसिद्ध. त्यांनी आपल्या समुदायाला समृद्ध जलचर आणि त्यांच्या उपजीविकेचे प्राथमिक स्त्रोत पुनर्संचयित करण्याच्या महत्वपूर्ण कार्यात उल्लेखनीय नेतृत्व पार पाडले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

  • स्टीव्हन मुन्सी (अमेरिका): मानवतावादी कार्य तसेच निर्वासितांना सहाय्य करणारे अमेरिकन नागरिक. आग्नेय आशियातील विस्थापित निर्वासितांना त्यांचे जीवन पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांनी उत्तम कार्य केले आहे.

  • वॉच डॉक (WatchDoc): शोध पत्रकारितेसाठीचा पुरस्कार. इंडोनेशियातील दुर्लक्षित मुद्दे अधोरेखित करण्यासाठी कल्पकतेने डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग तसेच वैकल्पिक प्लॅटफॉर्म एकत्र करणारे प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस.

रेमन मॅगसेसे पुरस्काराबाबत (Ramon Magsaysay Award) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९५८ साली रेमन मॅगसेसे पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती.

  • पुरस्कार प्रदानकर्ता देश: फिलीपाईन्स देशामार्फत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

  • पुरस्कार विशेषता: सदर पुरस्कार हा आशियातील सर्वोच्च सन्मान असून त्याला नोबेल पुरस्काराच्या समतुल्य मानले जाते.

  • पुरस्कार प्रदान करण्यात येणारी क्षेत्रे: हा पुरस्कार शासकीय सेवा, लोकसेवा, समुदाय नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य आणि क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्ट्स, शांतता आणि आंतरराष्ट्रीय समज तसेच उदयोन्मुख नेतृत्व या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात येतो.